• (0233) 2313999
  • shantiniketansangli@gmail.com
  • सांगली, महाराष्ट्र

भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिकुर्डे

आम्ही केवळ वारकरी नाही, केवळ धारकरी नाही. केवळ शेतकरी नाही, केवळ कामकरीही नाही. आम्ही शककर्त्या राज्यकर्त्याचे वारसदार आहोत. दर्यावर्दी खलाशी आहोत. जागतिक व्यापारी आहोत. भुरळ पाडणारे कारागीर आहोत. जीवनाचं कुठलंही क्षेत्र आम्हाला अज्ञात नाही..असं सांगून नव्या पिढीच्या अंगात प्रोत्साहन भरणाऱ्या आणि त्यांना जगायला शिकवणाऱ्या प्राचार्य  डॉ. पी.बी. पाटील याचं जन्मगांव  चिकुर्डे. वाळवा तालू्क्यातील या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. याच गावातून सांगलीत येऊन नंतर महाराष्ट्र आणि पार परदेशातही आपला नावलौकिक सिद्ध करुन दाखवलेल्या प्राचार्य  पाटील याचा आपल्या गावावर जीवापाड जीव होता. त्याकाळात एकपिंड मंडळ या कलापथकातील पदवीधर झालेल्या बऱ्याच सदस्यांनी एकत्रित येऊन चिकुर्डे येथे ही शाखा सुरू करण्याचा संकल्प केला. या शाखेचं उद्घाटन स्व.यशवंतरावजी चव्हाण आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालं असून स्व.विठ्ठलराव देशमुख (सरकार) यानी या शाळेसाठी बक्षिसपत्रानं १७ एकर जागा देऊन शाळेस मोठा हातभार लाभला आहे. या शाखेचं कामकाज माळ विभाग आणि गाव विभाग अशा दोन ठिकाणाहून चालतं. सुसज्ज व्यायामशाळा आणि प्रयोगशाळा, आय.टी.लॅब इ. सोयि शाखेत उपलब्ध असून सुमारे १००० विद्यार्थी याठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहेत. नुकतेच याठिकाणी बालविकास इंग्रजी माध्यमाचा पूर्व प्राथमिक व प्राथमिक अभ्यासक्रम शासनमान्यतेनं सुरू करण्यात आला आहे.