"चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आणि वाईटाला वाईट म्हणायची हिंमत जन-गण-मनात निर्माण झाल्याशिवाय अधिनायकाचा विजय होणार नाही."
— प्राचार्य डॉ. पी.बी.पाटीलहे नुसतं म्हणून ते थांबले नाहीत तर असा अधिनायक घडवण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यातून उभे राहिले नवभारत शिक्षण मंडळ. १९५२ मध्ये अनौपचारिक रणशिंग फुंकल्या नवभारत शिक्षण मंडळाच्या कामाला १० फेब्रुवारी १९५८ रोजी कायदेशीर मान्यता व घटनात्मक स्वरूप मिळाले.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय शासनाचा अस्त नाही तर प्रयत्नाला मोकळीक, सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करण्याची संधी! याच भान ठेवत मानवतावादी मन, संशोधक बुध्दी आणि सत्याग्रही वृत्ती असणारा कणखर शरीराचा नागरिक घडवण्यासाठी जाणिवपुर्वक ‘नवभारत’ चा जन्म झाला आहे.
महाराष्ट्रात शिक्षण संस्था कमी आहेत म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली नाही तर चाकोरीबाह्य पण योग्य शिक्षण अमलात आणून नवभारताच्या उभारणीत एक ‘चांगला नागरिक’ निर्माण व्हावा हा उद्देश यामागे होता.
या संस्थेच्या उभारणीत नवा विचार घेऊन अनेक महान व्यक्ती उभ्या होत्या. त्यांचं लाख मोलाचं मार्गदर्शन व सक्रिय सहकार्य संस्था उभारणीसाठी मिळाले.
पुढील काळात लाभलेले बहुमोल मार्गदर्शन:
या साऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनानं आज इतक्या वर्षांनी शांतिनिकेतनचं रूप आणि स्वरूप, चारी अंगांनी प्रचंड बदललं आहे. संस्था ग्लोबल झाली आहे, पण तरीही बहुजन कष्टकरी जनतेशी असलेली नाळ मात्र कायमची जोडली गेली आहे.
प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या कल्पनेतील ‘नवभारत’ घडविण्याचं काम सरोजताई पाटील (माई) यांनी केलं. त्यांच्यानंतर आता ही संस्था सर्वार्थानं समर्थ आणि संस्कारक्षम केली ती संचालक श्री. गौतम पाटील यांनी.
दर्जेदार शिक्षणासोबत दर्जेदार कला आणि क्रीडा यांचं प्रशिक्षण देणारी ही एकमेव संस्था.
कल्पनेच्या पलिकडील अनेक उपक्रम श्री. गौतम पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत आहेत.