आमचे संस्थापक

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील
राष्ट्राचा अभिमान

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील

प्राचार्य डॉ.पी.बी. पाटील म्हणजे देशातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व. भारतीय समाजातील एकूण एक क्षेत्रात साहेबांनी आपल्या कार्याची मोहोर उमटवलेली आहे. समाजमनाच्या सर्वांग उन्नतीसाठी आपली सारी हयात त्यांनी निरपेक्षपणे व्यतीत केली. "व्यक्तीच्या उन्नतीमध्ये राष्ट्राची प्रगती दडलेली असते", हा त्यांचा साधा सोपा विचार वेळो वेळी अधोरेखित झाला आहे. त्यांच्या पश्चात आजही त्यांचे बहुमोल विचार समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. समाजभान बाळगून समाज वैभवाच्या विचारांचं ऐश्वर्य शेवटच्या श्वासापर्यंत जोपासणारे साहेबांचे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्राचा अभिमान आहे.

शेतकरी आणि साहित्यिक हे समाजाचे दोन मुख्य घटक असतात. समाज रथाची ही दोन चाकेच. एक जगवतो तर दुसरा कसं आणि का जगायचं हे शिकवतो. साहेबांच्या ठायी या दोन्ही घटकाचा आदर्श मिलाप आहे. साहेबांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. त्यामुळे ते जन्मजात शेतकरी होतेच पण आपल्या दूरदृष्टी कुशल लेखन व वक्तृत्व कौशल्याने साहित्यिक म्हणून साहेबांनी मिळवलेला लौकिक आजही टिकून आहे.

बालपण आणि शिक्षण

मकर संक्रांती दिवशी म्हणजे १४ जानेवारी १९३२ रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील चिकुर्डे या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. चिकुर्डे या गावातच त्यांनी औपचारिक शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पारतंत्र्याचा तो काळ होता. प्रभात फेऱ्या आणि राष्ट्र सेवादलाच्या प्रत्येक कार्यक्रमास साहेबांचा लहान वयातही सहभाग असायचा. कै. पांडु मास्तर, शहीद शंकरराव निकम, श्री. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सारख्या क्रांतिकारकांना ते उत्साहाने मदत करायचे.

शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास

१९५२ मध्ये आपल्या मुद्देसूद वक्तृत्वाने स्पर्धा जिंकून मिळवलेल्या पैशातून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी इस्लामपूर येथे एक आश्रमशाळा स्थापन केली. १९५५/५६ मध्ये आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सक्रिय होण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला एक वर्ष रामराम ठोकला. १९५७ मध्ये साहेबांनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला आणि एम.ए. झाले. १९५८ साली त्यांनी 'नवभारत शिक्षण मंडळ' या नावाने नव्या भारतासाठी आदर्श शिक्षणाची कवाडे खुली केली.

राजकीय आणि संस्थात्मक योगदान

प्रा.डॉ.पी.बी.पाटील साहेब हे उत्तम राजकीय विश्लेषक आणि सखोल जाणकार अभ्यासक होते. १९७२ ते १९७८ या पाच वर्षात त्यांनी आमदार म्हणून आपला वेगळाच राजकीय आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला करुन दिला. पुढे त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपवली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ एज्युकेशन पुणे अशा अनेक संस्थांची स्थापना आणि विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

मिळालेले पुरस्कार

प्लॅटिनम ज्युबिली इन्डॉव्हमेंट ट्रस्ट अवॉर्ड (इंडियन मर्चंट चेंबर) २०००
सन्माननीय “डी लिट” (श्री शिवाजी लोकविद्यापीठ, अमरावती) २००२
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार २००४
मराठाभूषण पुरस्कार (इस्लामपूर) & फाय फाऊंडेशन पुरस्कार (इचलकरंजी)
श्री शाहू पुरस्कार २०१२ & सांगली भूषण पुरस्कार २०१३

अलौकिक लेखन संपदा

महाराष्ट्राची जडण-घडण आणि यशवंतराव
जन-गन-मन
(मुक्तचिंतन, समाजकारण, राजकारण)
नवभारत परिवर्तनाची दिशा
(कार्ले शिबीर-परिसंवाद)
शिवशाही ते पेशवाई & नवेगांव आंदोलन
क्रांतीसागर & भाषण संग्रह
“कालप्रदक्षिणा”
(कविता संग्रह)
प्राचार्या सौ. सरोजताई पाटील (माई)
संस्थेचा आधारवड

प्राचार्या सौ. सरोजताई पाटील (माई)

जेष्ठ विचारंवत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्यासारख्या हाडाचा कार्यकर्ता असलेल्या मुलखावेगळ्या माणसाचा संसार सांभाळणं ही साधी सोपी सरळ गोष्ट नव्हतीच मुळात, पण माईंनी हा संसार नुसता सांभाळलाच नाही तर आपल्या संसारासोबत संस्थेचा संसारही समर्थपणानं पेलला. हजारो गोरगरीब मुलांच्या त्या माई झाल्या. माई गेल्या तरी त्यांची माया आजही त्या मुलांच्या मनात ताजीतवानी आहे.

माईंचा जन्म ६ मे १९४७ साली बेळगांवात एका संस्कार संपन्न घरात झाला. १० वी पर्यंतचे शिक्षण वनिता विद्यालय या मिशनरी स्कूल मध्ये झाले. येथूनच त्यांच्या संस्कारक्षम जीवनास सुरूवात झाली. पुढे त्यांनी लिंगराज कॉलेज, बेळगांव येथे ग्रॅज्युएशन केले. २२ जून १९६२ ला प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील साहेबांशी त्यांचा विवाह झाला. साहेबांनी समाज जीवनास पूरक असा संस्थात्मक आराखडा मांडावा व त्याची पूर्तता सौ.मार्इंनी करावी, हे सूत्रच बनले.

माईंचे बहुमोल योगदान
  • संस्थेतील मंडळींना आपली कुटूंबिय मानून त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात त्या सहभागी होत. संस्थारूपी कुटुंबाच्या त्या आधारवड झाल्या.
  • बालविकास इंग्रजी माध्यम, कन्नड शाळा, मुक्त विद्यापीठ, मराठी माध्यम असो किंवा अकॅडमीची सुरूवात, सर्व शाखांच्या विस्तारामध्ये त्या जातीनं सक्रिय असतं.
  • लोकनृत्याच्या आवडीतून दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम तयार केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही एक मोठी पर्वणीच असायची.

"साहेब आणि माईंच्या नावे उभारण्यात आलेले गुरुकुल त्यांच्या आदर्शाची शिकवण देत आहे."

साहेबांनी ज्या ज्या विविध क्षेत्रात कार्य केलं त्या क्षेत्रांच सोनं केलं. आजही शांतिनिकेतनच्या रम्य परिसरात साहेबांनी उभारलेला उंच ऑगस्ट क्रांती स्मृती स्तंभ त्यांच्या उदात्त भव्यतेची स्मृती चाळवतो. गुरुबनमधील त्यांचा पुतळा आजही आपल्या अमोघ वाणीने तिथे येणाऱ्या प्रत्येकाला विचारांचा नवा आयाम देत मार्गदर्शन करीत आहे.